Sunday, April 29, 2018

-- सुटका भाग -- 

"श्री मला बघायचे आहे कसे असते प्लॅनचेट" कुमार श्रीधरला रूममध्ये आल्या आल्या म्हणाला

"अरे, ते असे कधीपण नाही करता येत, पण तू आता रहाणार आहेस ना आठवडाभर इथे, मी दाखवीन तुला".
श्रीकांत मूळचा कोल्हापूरचा, पण तीन महिन्यापूर्वी चाकण येथील हिंदुस्थान स्टील अँन्ड कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून रुजू झाला होता. तो कंपनीच्या हॉस्टेल मध्ये राहत होता.

 कुमार आणि श्रीकांत दोघे लहानपणापासूनचे खास मित्र. कुमार त्याची परीक्षा संपवून श्रीकांतकडे सुट्टीसाठी आला होता. बोलताना श्रीने कुमारला तो आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या प्लॅनचेट बद्दल माहिती दिली. त्या वेळेपासून कुमारला प्लॅनचेटबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.

रात्री कॅन्टीनमध्ये जेवण झाल्यावर, कुमारने श्रीला पुन्हा एकदा आठवण करून दिली. कुमार, श्रीकांत त्याचे मित्र जेवण झाल्यावर, होस्टेलच्या स्पोर्टरूम मध्ये आले. सर्वजण टी टी टेबल सभोवती जमा झाले.
"सुन्या, आपले साहित्य बाहेर काढ". सुन्याने कपाटातून एक कापडी पिशवी आणली आणि टेबलवर ओतली.
खडू, वाटी, मेणबत्या, काडेपेटी इत्यादी साहित्य बाहेर पडले.

सुन्याने सराईतपणे खडू घेऊन, टेबलवर एक चौकोन आखला, मध्यभागी एक वर्तुळ, साईडला A ते Z अक्षरे, 0 ते 9 आकडे आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूला, YES आणि NO लिहिले. नंतर, चौकोणाच्या चारही टोकांवर 4 मेणबत्त्या लावल्या.

सुन्या, श्रीकांत आणि रमेश तिघे टेबलच्या तीन बाजूनी बसले आणि इतर सर्व समोर बसले. कुमार उत्सुकतेने हे सर्व बघत होता.

श्रीकांतने वर्तुळात एक नाणे ठेऊन त्यावर एक छोटी मेणबत्ती चिटकवली

"आता आपण प्लॅनचेट सुरू करणार आहोत. जर कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी आताच इथून निघून जावे, नंतर कोणालाही बाहेर जाता येणार नाही". श्रीकांतने सर्वाना कल्पना दिली आणि सर्व मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. नंतर एक वाटी घेऊन त्या नाण्याच्यावर उपडी ठेवली आणि म्हणला आता आपण प्लॅनचेट सुरू करणार याची कल्पना दिली.

सुन्या, श्रीकांत आणि रमेश यांनी आपली बोटे वाटीवर टेकवून "*** *** ***" मंत्र म्हणू लागले. थोड्या वेळ शांततेत गेल्यावर एकदम आवाज आला
 
"खर्रर्रर्रर्र"... 

आणि तिथे असलेल्या सर्वाना कल्पनाही नव्हती की ते सर्वजण, एक मोठ्या अडचणीत सापडणार होते.
वाटी जागेपासून थोडी हलली होती. "जर कोणी आले असेल तर कृपया वाटी YES कडे न्या" श्रीकांत बोलला आणि वाटी हळूहळू YES कडे सरकू लागली. कुमार उत्सुकतेने बघू लागला.

"जर तुम्हाला कांही प्रश्न विचारले तर चालतील का ? जर हो असेल तर परत मध्यभागीच्या गोलकडे जा"
वाटी गोलकडे सरकू लागली...

"कृपया आपले नाव सांगा. तुम्ही A ते Z आकडे वापरून सांगू शकता".

आणि वाटी सरकू लागली

" N I S H A   R A J E N D R A  D E S H M U K H  ". 

"आपला मृत्यू कधी झाला होता ?"

"2015"

"मृत्यूचे कारण सांगू शकाल का ?"

"M U R D E R"

एकदम सन्नाटा पसरला, सर्वजण घाबरून एकमेकांकडे बघू लागले.

"कोठे राहत होता तुम्ही"

"H I N D U S T A  N  S T E E L  A N D  C O M P A N Y  H O S T E L"

सर्वांच्या पाठीतून थंड बर्फाची लहर गेली, पुढे काय विचारावे हे कोणालाच समजेना

"आभारी आहे, आपण जायचे असेल तर कृपया YES वरती जा"

वाटी थोडावेळ थांबुन YES कडे गेली.

"आभारी आहे. जाताना वाटी मध्यगोलावर आणा म्हणजे आम्हाला समजेल की आपण गेला आहात"
वाटी माध्यगोलावर जाऊन थांबली.

"शीट यार, आपण थोडावेळ अजून बोलू शकलो असतो तिच्या बरोबर" कुमार सर्वाना म्हणाला.

"अरे, मर्डर झाला होता तिचा आणि ती इथेच राहायची होस्टेलवर. समजतंय ना. जाम फाटली माझी" सुन्या म्हणला.

"अरे सुन्या, पण" कुमार बोलला

"पुढच्या वेळी तू बस मग करायला, पण आता साफ करा नाहीतर उद्या नोटीस येईल आणि घरी जावे लागेल सर्वाना." सुन्या...

सर्व साफसफाई करून सर्वजण आपआपल्या रूमकडे झोपायला गेले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

रात्री बेडवर पडल्यावर कुमार श्रीकांतला बोलला "अरे, कोण असेल ती. 2015 ला मर्डर झाला होता तिचा. तुम्ही काही ऐकले नाही का ?"

"नाही रे, कधी विषय पण नाही झाला. आणि तू पण शांत बस आणि बोलू नको कोठे, नाहीतर घरी यावे लागेल मला तुझ्याबरोबर."

"हम्म"... पण कुमार डोळे झाकून विचार करू लागला, "काय झाले असेल तिला"

सकाळी, सगळे ऑफिसला गेल्यावर, कुमार चक्कर मारायला गावात गेला

"मित्रा, एक फक्कड कटिंग दे "

"नवीन दिसताय गावात पाव्हने", चहा देताना सदा बोलला.

"हम्म, मित्राकडे आलोय, हिंदुस्तानच्या हॉस्टेल वर... सगळे कमाला गेले म्हणून बाहेर पडलो "

"येत जा मग, गप्पा मारायला" सदा

"नाव काय तुमचे ?" कुमारने विचारले

"सदाशिव, मला सदा म्हणाले तरी चालेल. तुमचे नाव काय ? " सदा

"कुमार कुलकर्णी, मी कोल्हापूरहुन आलोय"

"सदा,  कधीपासून राहतो इथे तू"

"झाले असतील 8 ते 10 वर्षे"

"एक विचारू का तुला"

"तीन वर्ष पूर्वी होस्टेलवरच्या कोणाचा मर्डर झाला होता का ?"

"कोण बोलले तुला"

"ते जाऊ दे,  तू सांग काय झाले होते"

सदा, एकदम गंभीर झाला. "मर्डर नाही, आत्महत्या. "

"काय " कुमार उद्गारला, त्याला नक्की काय ते समजेना.

" राजूदादा आणि निशाताई, भरपूर छान होती स्वभावाने दोघे. कायम इथून जाताना माझी आणि आईची विचारपूस करून जायची. जेंव्हा आम्हाला समजले तेंव्हा एकदम धक्का बसला आम्हाला, दोन तीन दिवस काहीच सुचत नव्हते मला"

"अरे अरे" कुमार म्हणाला "कसे झाले हे ?"

"ते नाही समजले ."

"पोलीसांनी कांही शोध घेतला नाही का ?"

"त्यांनी, भरपूर शोध घेतला पण कांही धागेदोरे नाही मिळाले"

"पण कुमार, तुला कोठून समजले हे"

"सहज, ऐकले इकडून तिकडून" असे बोलून कुमारने विषय बदलला.


संध्याकाळी, सर्वजण ऑफिसवरून आल्यावर, कुमार सर्वाना सदाबरोबर झालेले संभाषण सांगितले. सर्वजण गंभीर झाले.

रात्री, जेवताना सर्वजण शांत होते.

"परत करूया का रे आज रात्री" कुमार सगळ्यांना बोलला.

"अरे नको, कालच्या प्रकाराने धक्का बसलाय सर्वाना" सुन्या बोलला.

"अरे, तिला कांही सांगायचे असेल तर आज पण येईल ती" कुमार

श्रीकांत म्हणाला, "हम्म, करूया असे वाटते. सगळे काय म्हणता ?"

"चला, करूयात" सुन्या बोलला आणि उठून कपाटातून पिशवी काढून तयारीला लागला. कुमार त्याला मदत करू लागला.

आज सुन्या, श्रीकांत आणि कुमार बसले प्लॅनचॅट करायला.

"खर्रर्रर्रर्र"

"तुम्ही, निशाताई असाल तर YES कडे जा" कुमार बोलला.

वाटी हळूहळू YES कडे जाऊ लागली.

"ताई, नक्की काय झाले ते सांगू शकाल का तुम्ही"

"NO"

"ताई, उत्सुकता म्हणून नाही तर तुम्हाला न्याय मिळवता येईल यासाठी प्रयत्न करेन मी"

सर्वजण दचकून कुमारकडे पाहू लागले.

"ताई प्लीज, काय झाले होते नक्की, सांगू शकशील का ?"

वाटी NO वरतीच राहिली.

"ठीक आहे, जर तुम्हाला आमच्याशी बोलायचे नसेल तर ठीक आहे"

"तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही मधील गोलकडे जा

वाटी मध्यल्या गोलकडे जाऊन शांत झाली.

सर्वजण, टेबल साफ करून रूमकडे गेले.

झोपताना कुमार निशाचा विचार करत झोपी गेला.




 
----------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखक, संकुल
 

1 comment: