Sunday, July 29, 2018

निर्दोष भाग 1


लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी )
माझ्या नावाने ही कथा कोठेही छापण्यास माझी परवानगी आहे..

निर्दोष भाग 1 


पात्र परिचय :

श्रवण कुलकर्णी -
 वय ३० वर्षे,  एक प्रथितयश वकील... गुन्हेगारी खटले चालवण्यात हातखंडा... फी पेक्षा पदरमोड जास्त...
सई -
वय २६ वर्षे, सुंदर, नाजूक,  कुरळे केस, बिनफ्रेमचा चष्मा, श्रवनची सेक्रेटरी, मनापासून श्रवनवर प्रेम
सुलतान -
वय ३२ वर्षे, व्यवसाय पहिलवान, श्रवनची बालमित्र... त्याच्या प्रत्येक भानगडीत साथीदार.. त्याचेच घरी राहायला
सोहम -
वय १६ वर्षे, गोरा गोमटा.. आत्ताच टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतले होते ( घरी दाखवायला )
प्रोफेशनल हॅकर, कोणताही मोबाईल, कॉम्पुटर, नेटवर्क हॅक करणे डाव्या हाताच्या खेळ.
अजिंक्य जाधव -
सिनियर पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखा... श्रवनचे चांगले मित्र.
डॉक्टर न्याती जोशी - फॉरेन्सिक एक्स्पर्ट
श्रवण, अजिंक्य आणि न्याती तिघे शाळेपासूनचे मित्र...
-----------------------
श्रवण सकाळी लवकर उठला होता. व्यायाम आवरून गरम गरम कॉफी घेऊन बाल्कनीमध्ये बसून एका केसचा विचार करत होत, इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आले म्हणत त्याने उठून दार उघडले... बाहेर एक वयस्क जोडपे उभे होते. दोघे बरेच दमलेले दिसत होते बहुदा रात्रभर झोपले नव्हते.
 त्याने दोघांना आत घेऊन दार लावून घेतले.
" मी गजानन देसाई आणि ही माझी पत्नी अपर्णा देसाई. आम्ही कोल्हापूरला असतो. मी करवीर नागरी पतसंस्थेमध्ये क्लार्क आहे. " हात जोडत त्यांनी स्वतःची ओळख करून दिली.
" बोला, मी काय करू शकतो तुमच्या साठी " श्रवनने विचारले.
" आमचा मुलगा राहुल सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नोकरी निमित्ताने पुण्याला असतो. तीन दिवसांपूर्वी आम्हाला त्याच्या कंपनीमधून फोन आला की त्याला खुनाच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसानी अटक केली आहे. "
थोडे क्षण थांबून गजानन म्हणाले " आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन राहुलची भेट घेतली. तो म्हणतोय की त्यानेच खून केलाय. पण आम्हाला विश्वास आहे की राहुल असे करणार नाही. त्याला कोणीतरी अडकवताय या आरोपात. " जवळपास रडत गजानन बोलत होते.
" आमच्या मुलाला वाचवा यातून. मी पाया पडते तुमच्या. तुमचे नाव ऐकून येथे आलो आम्ही. " अपर्णा हात जोडून म्हणाल्या.
" काकू, मला शक्य असेल ते सर्व मी करेन, पण जर राहुल निर्दोष असेल तर. जर त्याने खून केला असेल तर मात्र मी या मध्ये काही मदत करणार नाही " श्रवनने सांगितले.
" मला नक्की काय झाले ते सांगा "
" तानाजी म्हस्के , राहुलच्या बिल्डिंग समोर राहणार मुलगा. MPSC च्या  अभ्यासाची तयारी करत होता. मूळचा जळगावचा. राहुलवर आरोप आहे की त्याने तानाजीचा खून केला. आणि राहुलने गुन्हा कबूल केला आहे . राहुलचे म्हणणे आहे की, त्याचे आणि तानाजीचे भांडण झाले आणि रागाच्याभरात त्याने तानाजीला चाकूने भोसकले आणि त्याचा खून केला "
" मग, तुम्हाला असे का वाटते की तो निर्दोष आहे "
" राहुल एकदम शांत मुलगा आहे आणि तो इतका चिडेल हे आम्हाला पटत नाही "
" ठीक आहे , काका, तुम्ही सध्या कोठे राहत आहेत ? "
" राहुलच्या रूम वर "
" ठीक आहे.मला रूमचा पत्ता द्या आणि  तुम्ही दोघे रूमवर जाऊन थोडा आराम करा. मी दहा वाजता पोलीसस्टेशनवर जाऊन राहुलला भेटून येईन.... मग सविस्तरपणे बोलू सगळे "
" ठीक आहे " म्हणत दोघे तेथून निघाले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सई, सकाळच्या अपॉईंटमेंट पुढे ढकल. आपल्याला हिंजवडी पोलिस स्टेशनला जायचे आहे "
" श्रवन, कांही नवीन केस ? "
" हो " म्हणत श्रवनने सईला सर्वकाही सांगितले.
दोघे श्रवनची होंडा सिटी घेऊन पोलिस स्टेशनला निघाले...
श्रवणला पाहून हवालदार मोरे पूढे आले.. " बोला श्रवणसाहेब, आज काय काम काढले ? "
" नमस्कार मोरेसाहेब, मला राहुल देसाईंना भेटायचे आहे. त्यांची केस माझ्याकडे आहे. पण चला तुम्हाला वेळ असेल तर चहा घेऊन येऊ. सई तू बाकी फॉर्मलिटी पूर्ण कर, आलोच आम्ही. "  मोरेना घेऊन श्रवण बाहेर गेला...
गप्पा मारता मारता त्याने एकदम मुद्द्यालाच हात घातला.
" मोरे साहेब, काय वाटतंय तुम्हाला या पोराबद्दल ? "
" कांही खरं नाही पोराचं... गुन्हा कबूल केला आहे त्याने पण मर्डर त्याने केलाय असं नाही वाटत "
" का ? "
" पोरगं बघाल तर पाप्याचे पितर.. एकूण वजन ५५  किलो. तो तानाजी पैलवान गडी होता. एका हातानं चिरडले असतं त्याने याला. हा काय भोसकतोय त्याला. अनेक वार केलेत याने त्याच्यावर. गुन्ह्यात वापरलेला चाकू हा पण छोटा आहे, ता चाकूच्या तीन ते चार वारात तानाजी संपेल असे वाटत नाही, यांनी पहिला वार केल्यावर तानाजीने प्रतिकार केला असता. नक्की काय ते समजत नाही. "
" हम्म. चला भेटून बघतो त्याला काय म्हणतो ते " उठत श्रवण म्हणला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" हाय राहुल, मी श्रवण कुलकर्णी, मी वकील आहे. तुझे आई आणि वडील आले होते माझ्याकडे तुझ्या केस संदर्भात. श्रवनने ओळख करून देत सांगितले.
" मी सांगितले होते त्यांना. मीच मारलंय तानाजीला. मला नको आहे वकील "
" अरे, नक्की काय झाले होते ते तरी सांगशील का ? म्हणजे तू त्याला मुद्दाम मारले की अपघाताने हे समजेल आणि तसे मुद्दे मांडता येतील आपल्याला "
" त्या दिवशी तानाजी आणि माझे भांडण झाले आणि रागाच्या भरात मी त्याला चाकूने भोसकले. हा गुन्हा मला मान्य आहे " एका वाक्यात राहुलने सांगितले.
" चाकू कोठून घेऊन आलास ? "
" तिथे पडलेला होता "
" बिल्डिंगकच्या टेरेसवर चाकू कोण टाकेल ? "
" माहिती नाही "
" बरं....  कशावरून भांडण झाले तुमच्यात ??? पैसे ? "
"..."
" मुलगी ? "
"..."
" अरे तू बोलला नाही तर कसा सोडवू मी तुला यातून ? "
" तुम्हाला सांगितले ना, मला वकील नको. तरी मला का प्रश्न विचारत आहात ? ""
" ठीक आहे, बोलतो मी तुझ्या बाबांशी " म्हणत श्रवण तिथून उठला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सई, हा मुलगा कोणत्या तरी मुलीच्या भानगडीत अडकला आहे. आणि ती मुलगीच या खुनाचे कारण आहे. "
" कशावरून असे म्हणतो आहेस ? "
" तो माझ्याशी बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा मी कारण विचारले तेंव्हा मुलगी म्हणल्यावर एकदम रिऍक्ट झाला. आता आपल्याला शोधले पाहिजे की कोण आहे ती मुलगी आणि त्या दिवशी नक्की काय झाले होते "
" हम्, मग प्लॅन काय आहे ? "
" नेहमीचाच "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
घरी आल्यावर श्रवनने सोहमला बोलावले.
" हां दादा ? "
" सोमी, जर तुझ्या आंतरजालावर राहुल देसाई बद्दल काय माहिती मिळते ते बघ. हा घे त्याचा फोटो. कोणा मुलीच्या भानगडीत आहे का ते बघ" म्हणून त्याने सोहमला केस बद्दल माहिती दिली.
" ठीक आहे. रात्री बोलू " सोहम बोलेला.
" ठीक आहे, जेवताना बोलू "
रात्री श्रवण, सोहम, सई आणि सुलतान सगळे जेवणाच्या टेबलवर जमले. जयश्रीमावशींनी जेवण वाढले.
" बोल काय माहिती काढलीस ? "
" राहुल देसाई, मूळचा राहणारा शिवाजी पार्क, कोल्हापूर.
वडील क्लार्क, आई हाऊसवाईफ,
शाळा सेंट मेरी सेकंडरी स्कूल, दहावीला ९४% मार्क,
बारावी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, मार्क 96 %,
इंजिनीरिंग, पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, चारही वर्षे कॉलेज टॉपर. कॅम्पस सिलेक्ट.
सध्या टेक्नोसॉफ्ट मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन काम करतोय. वर्षे. त्याचे कंपनी मेल बघता, कामामध्ये सिंसिअर दिसतोय,
Twitter आणि instagram वर पण नॉर्मल लोकांना follow करतो. हिंदी मध्ये आलिया भट आणि मराठीमध्ये  प्रिया बापट आवडती अभिनेत्री...
Facebook वर शाळा, कॉलेज आणि ऑफिसचे मित्रांना कनेक्टेड आहे..."  सोहमने पाण्याचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.
" सोहम दिसतो गुणी बाळ, पण आहे खतरनाक. कोणीही यांच्यापासून वाचू शकता नाही " सई सोहमच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.
" दीदी, सांगू का, तूझ्या मोबाईलवर कोणाचे फोटो आहेत आणि सारखे कोणाचे प्रोफाइल बघत असते " तिला डोळा मारत सोहम बोलला.
" पुढे सांग.. " गंभीरपणे श्रवण बोलला.
" हम्म, आत्ता पर्यंत सर्व ठीक होते पण गेल्या एक वर्षांत एक मुलगी त्याची एक फेसबुक फ्रेन्ड झाली आहे. प्रियांका पाटील, दिसायला सुंदर आहे. हा तिचा फोटो " म्हणत त्याने प्रियांका चा फोटो श्रवनला दाखवला.
" राहुल तिचे फोटो, पोस्ट लाईक करत असतो. मला वाटते, तीच असावी ती मुलगी "
" मग मी त्याचे gmail हॅक केले आणि तिथून त्याचे मोबाईल बिल डाउनलोड केले.
844 xxx xxxx  या नंबर वर राहुलचे लेट रात्री कॉल असतात म्हणून मी त्या मोबाईलवर कॉल करून चेक केले तर तो तिचा होता. तिला थोडे ऍडचे अमिश दाखवून तिला माझी URL पाठवली आणि प्रोफाइल रजिस्ट्रेशन करायला सांगितले..
तिने लिंक क्लीक केली आणि माझा virus तिच्या मोबाईलवर इन्स्टॉल झाला.
तिने ragistration करताना  प्रियांका पाटील, फ्लॅट नंबर B-606, मधू-मालती,  दत्तनगर,  जांभुलवाडी, कात्रजचा पत्ता दिलाय आणि तिचा gmail मेल आयडी दिला.
तो gmail आयडी हॅक केल्यावर तिचे अजून सहा फेक आयडी मिळाले.
प्रियांका पाटील
राधिका गिरी
श्रुती सुर्वे
केतकी यादव
सर्वांगी म्हात्रे
सोनाली बापट
आणि तिचे खरे नाव आहे सुकन्या करपे, मूळ गाव जळगाव.
तिच्या मोबाईलवर, तिचे बऱ्याच मुलांबरोबर फोटो आहेत.
मला वाटतंय ती मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत असेल.
तानाजी हा तिच्या गावचा. दोघांचा संपर्क होता "
" मस्त माहिती काढलीस, शाब्बास. तुला रॉ वाले शोधत येणार हे नक्की " सोहमचे कौतुक करत श्रवण बोलला.
" थँक्स, दादा हे घे तिचे वेगवेगळ्या मुलांबरोबरचे आक्षेपार्ह फोटो " म्हणत त्याने लॅपटॉप श्रवनकडे सरकवला.
" गुड जॉब, let me copy these on my cell phone "

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" नमस्कार साहेब, कशी आठवण काढली गरिबांची " विठ्ठल फोनवर श्रवनला बोलला.
" अरे एक काम होते, दत्तनगर जांभुलवाडी मध्ये मधू-मालती नावाची बिल्डिंग आहे.  तिथे फ्लॅट नंबर B 606 मध्ये प्रियांका पाटील नावाची मुलगी राहते. तिचा पूर्ण बायोडेटा हवाय.. "
" होऊन जाईल काम साहेब "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" तुम्हाला एकदा सांगितले ना की मला वकील नको आहे म्हणून, तुम्ही परत का आलात ? " वैतागत राहुल बोलला
" मूर्ख मुला, तुझ्या आई वडिलांसाठी आलो आहे मी येथे " थोडे ओरडत श्रवण बोलला " ऐक आता, त्या प्रियांका पाटीलच्या नादाला लागून स्वतःचे आयुष्य बरबाद करायला लागला आहेस "
प्रियांकाचे नाव ऐकताच राहुल चमकला... " तुम्हाला प्रियंकाची माहिती कशी मिळाली ? तिचा काही संबंध नाही या खुनाशी "
" अरे, हीच ना प्रियांका ? " म्हणत श्रवणने मोबाईल मधील फोटो त्याला दाखवायला सुरू केले... जसे जसे इतर मुलांसोबतचे फोटो त्याने बघितले तो हताश होऊन खाली बसला.
" हिचे खरे नाव प्रियांका नाही आणि तुझ्या सारख्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणे हा तिचा धंदा , तुझ्या आधी तिने बऱ्याच मुलांना फसवले असणार "
" खरे नाही वाटत "
" हेच खरे आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. ती सध्या सहा नावाने वावरते. तानाजी हा तिच्या गावाकडचा.... आता मला सांग, नक्की काय झाले होते त्या दिवशी ? "
" साधारण एक वर्षांपूर्वी, प्रियांका माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायला आली. ती एकटीच राहत होती. किराणा मालाच्या दुकानात माझी तिची ओळख झाली आणि मग गप्पा सुरु झाल्या. 
ती टीचर आहे म्हणून तिने सांगितले होते.
आमची मैत्री वाढत गेली, वीकएंडला मूवी बघायला जायचो आम्ही.. आम्ही एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिली होती. एक दोन वेळा आम्ही माथेरान आणि महाबळेश्वरला पण जाऊन आलो. सर्व मर्यादा पार केल्या आम्ही त्या वेळी... "
" पैसे मागितले का कधी तिने ? "
" हम्म, पगार झाला नाही म्हणून तिने माझ्याकडून वीस, तीस हजार असे घेतले होते दोन चार वेळा. परत देत होती पण मीच नको म्हणले "
" कांही महाग गिफ्ट दिलेस का तिला ? "
" तिचा मोबाईल चोरीला गेला म्हणून मी तिला Samsung Galaxy 8 फोन घेऊन दिला होता . "
"बर, त्या दिवशी नक्की काय झाले ? "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" हॅलो डिअर, कोठे आहेस ? " राहुलच्या फोनवर प्रियांकाचा फोन आला.
" ऑफिसवरून निघतोय "
" आलास की भेटुयात बिल्डिंगच्या गच्चीवर. तुला आज मी गोड surprise देणार आहे. "
" आलोच " म्हणून मनात surprise चा विचार करत राहुलने गाडी स्टार्ट केली.
बिल्डिंगच्या खाली गाडी पार्क करून राहुल लिफ्टने वर गेला. प्रियांका तेथे उभी होती. राहुल तिच्या जवळ गेला.
प्रियांकाने त्याचा हात हातात घेऊन स्वताच्या पोटावर ठेवला आणि लाजून म्हणाली "तू बाबा होणार आहेस "
"  काय ? खरंच " खुश होत राहुल म्हणाला " मी, आई बाबांना बोलावून घेतो आणि सांगतो आपल्याबद्दल. आपण लगेच लग्न करू " असे म्हणत राहुलने प्रियांकाच्या कपाळावर किस केले " तू थांब, मी खाली जाऊन गोड घेऊन येतो "

राहुल मिठाई घेऊन परत टेरेसवर आला आणि एकदम गोंधळून गेला...... समोर तानाजी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि प्रियांका हातात चाकू घेऊन उभी होती...
" प्रियांका ? " राहुल एकदम ओरडला आणि त्याने पळत जाऊन टेरेसचे दार बंद केले.
राहुलला आलेला बघून प्रियांका रडायला लागली....
तिला राहुलने जवळ घेतले...
" राहुल, हा मला खूप त्रास देत होता... सारखी छेड काढायचा माझी... आज मी एकटी उभी बघून याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला म्हणून मी मारले याला. " तिने रडत रडत सांगितले.. " तू कोणाला सांगू नको की मी याला मारलंय नाही तर तुझ्या घरचे मला स्वीकारणार नाहीत... मला माझी नाही तर आपल्या बाळाची काळजी वाटते "
" हम्म, चल आपण खाली जाऊ तुझ्या फ्लॅट मध्ये. आणि कोणाला काहीच बोलायला नको " म्हणत राहुल प्रियांकाचा हात धरुन दाराकडे गेला तेवढ्यात जिन्यातून मुले वर येताना आवाज आला.
" हे बघ, मुले जिन्यात आहेत. आपण खाली जाऊ शकत नाही.  तू टाकीमागे लप मी खाली धावत जातो, माझ्या अंगाला पण रक्त लागलाय, घाबरून मुले पळून जातील त्याच वेळी तू तुझ्या फ्लॅट मध्ये जा आणि लगेच कपडे बदल. "
" अरे पण तुझ्यावर आळ येईल ना "
" येऊ दे. मी सांगेन काही तरी आणि शिक्षा कमी करून घेईन, पण तुझ्या पोटात आपले बाळ आहे. मी सगळे सांगतो आई बाबांना, ते सांभाळतील तुला.... आता वेळ नको करू "
असे म्हणून तो दरवाजा उघडून खाली गेला. खालून एकदम मुलांचा किंचाळण्याचा आवाज आला आणि मुले पळून गेली..
प्रियांकाने कानोसा घेतला आणि तानाजीच्या प्रेताकडे कुत्सितपणे बघत म्हणाली " आला मोठा मला समजावणार... आता वरती जाऊन आईला समजावं माझ्या "
समोरून टाकीच्यामागून तो आला आणि दोघे तिच्या फ्लॅट मध्ये शिरले...
" आता काय करायचे ? " तिने विचारले
" बघूया काय होईल ते, राहुल पोलिसात गुन्हा कबुल करेल आणि स्वतःचे तोंड उघडणार नाही हे नक्की.... after all तू त्याच्या होणाऱ्या बाळाची आई आहे ना " म्हणत  त्याने तिला टाळी दिली..
इकडे, राहुलने खाली येऊन सरळ गाडी स्टार्ट केली आणि तो सरळ भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला आला.


क्रमश:

 



लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी )

1 comment:

  1. Harrah's Casino Reno - Mapyro
    Harrah's Reno. Hotel, Casino & SkyPod. 안성 출장마사지 777 Harrah's Blvd. Reno, NV 89040. Directions · 울산광역 출장안마 (800) 제주도 출장샵 693-4700. 논산 출장샵 Map. Harrah's Reno. Phone: (775) 746-7055. Driving 보령 출장마사지 Directions.

    ReplyDelete